बुलढाणा : मकर संक्रांतीचा सण जवळ आला की आकाशात रंगीबेरंगी पतंगांची उधळण पाहायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत पतंगांसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे गंभीर अपघात घडत असून अनेकांना गंभीर जखमा, तर काही ठिकाणी गळा चिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या वापराविरोधात उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.
नायलॉन मांजाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (SMPIL No. 1/2021) नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यापूर्वीही वेळोवेळी आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने आता आर्थिक दंडाची कडक प्रस्तावना मांडली आहे.
५० हजार ते अडीच लाख रुपयांच्या दंडाचा प्रस्ताव
न्यायालयाच्या प्रस्तावानुसार,
एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास त्याच्या पालकांना ५० हजार रुपये दंड का ठोठावू नये?
प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास त्यालाही ५० हजार रुपये दंड का ठोठावू नये?
तसेच नायलॉन मांजाचा साठा विक्रेत्याकडे आढळल्यास त्याला अडीच लाख रुपये दंड का ठोठावू नये?
या प्रस्तावित शिक्षांबाबतची सुनावणी ५ जानेवारी २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरिकांना सूचना व हरकती मांडण्याचे आवाहन केले आहे. प्रस्तावित शिक्षांबाबत कुणाला आक्षेप किंवा सूचना असल्यास, त्यांनी सुनावणीच्या दिवशी न्यायालयात हजर राहून आपले निवेदन सादर करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, या आदेशांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नायलॉन मांजासंदर्भात जनजागृती व नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे येत्या काळात नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि मोठ्या दंडाची संक्रांत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.