उरण : "उरण तालुक्यातील मोठीजुई गाव हे एकेकाळी उरण तालुक्यातील दुर्लक्षित गाव समजले जात होते; परंतु या गावात ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखविले. नुकतेच एका तरुणाचे अपघात दुर्दैवी निधन झाले. गावातील तरुणांनी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून त्या तरुणाला आर्थिक साह्य म्हणून प्रत्येकी १०० रुपये मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून चक्क साडेसात लाख रुपये जमा झाले. हा मोठीजुई गावाने उरण तालुक्यात नवीन पायंडा पाडला आणि आदर्शही घडवला आहे, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, विशेषतः तरुणांचे मनापासून अभिनंदन! तसेच टेनिस क्रिकेट सामने आज गावोगावी होत आहेत; परंतु वातानुकूलित व्यासपीठ, चांदीचा चषक, विजेत्यांना चांदीच्या अंगठ्या, क्रिकेट रसिकांना लकी ड्रा द्वारे बक्षीस देण्याचा आणखी एक नवीन पायंडा मोठीजुई गावाने क्रिकेटमध्ये पाडला आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांची चुरस आणखी वाढेल आणि रंगतही वाढेल,' असे मत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी (ता. २४) मोठीजुई गावच्या प्रीमियर लीगप्रसंगी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते यावेळी टेनिस स्पर्धांचे उद्घाटन झाले.
"मोठीजुई गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आता हक्काच्या मैदानासाठी कंबर कसली पाहिजे, मी त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे. मैदाने वाचविण्यासाठी गुरुचरण वा इतर जमीन असो, परंतु अडवा आणि मैदानाला प्राधान्य द्या," असेही महेंद्रशेठ घरत यांनी आश्वासित केले. यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी महेंद्रशेठ घरत यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी माजी सरपंच दीपक भोईर, मोठीजुई गावचे काँग्रेस अध्यक्ष रमेश पाटील, युवा कार्यकर्ते अमेय पितळे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.