पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद,उपप्रादेशिक कार्यालय पुणे (विदेश मंत्रालय,भारत सरकार) यांच्या सहकार्याने गुरुवार,दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी समूह कथक नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात,सेनापती बापट रस्ता) येथे पार पडला.
या कार्यक्रमात कथक नृत्यशैलीतील दोन विशेष सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकली.कथक नृत्यकलाकार मंजिरी कारुळकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या ‘कृष्ण आख्यान’ या नृत्यप्रस्तुतीत श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग कथक नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडण्यात आले.नृत्य,भावाभिनय आणि तालबद्धतेचा सुंदर संगम या सादरीकरणात अनुभवायला मिळाला.त्यानंतर कथक नृत्यकलाकार आसावरी पाटणकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेले ‘अर्पण गुरु को समर्पण’ हे गुरुपरंपरेला समर्पित नृत्यसादरीकरण सादर करण्यात आले.गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व,शिस्त आणि साधनेचा भाव या सादरीकरणातून ठळकपणे अधोरेखित झाला.दोन्ही सादरीकरणांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.आसावरी पाटणकर आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी स्किझोफ्रेनिया या आजारामुळे एकाकी पडत जाणाऱ्या रुग्णांच्या मनोअवस्थेचे चित्रण चैतन्य या समूह नृत्य नाट्याद्वारे सादर केले.कार्यक्रमास पुण्यातील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.कथक नृत्याच्या सौंदर्यपूर्ण आणि शास्त्रीय मांडणीमुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा २७० वा कार्यक्रम असून,अशा उपक्रमांमुळे शास्त्रीय कला परंपरेला चालना मिळत असल्याचे मत भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी व्यक्त केले.भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन शेट्टी,एक्सेंचर इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंकुर भंडारी,श्यामला वनारसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले.