अकोला : अकोला जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर कुटुंबातील काकाने तसेच शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीनेही या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी तातडीने दखल घेत संबंधित तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक व शारीरिक छळानंतर अखेर पीडित मुलीने आपल्या शाळेतील शिक्षकांकडे आपली आपबिती कथन केली. शिक्षकांनी संवेदनशीलता दाखवत तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले.या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडितेला न्याय मिळावा तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.