रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत ही घटना घडल्याने शहरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन, शहर बंद
या हत्येच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक खोपोली पोलीस ठाण्यात जमा झाले आहेत. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला असून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण खोपोली शहर बंद ठेवण्यात आले आहे.यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
जीवाला धोका असल्याची तक्रार दुर्लक्षित?
मंगेश काळोखे यांनी यापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी त्याची योग्य दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप नागरिक आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नेमकं घडलं काय?
मंगेश काळोखे हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
राजकीय वैराचा संशय
दरम्यान, राज्याचे मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “निवडणुकीचा निकाल लागताच ही हत्या होणं दुर्दैवी असून हा प्रकार राजकीय कटाचा भाग असू शकतो,” असे त्यांनी म्हटले आहे. दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून समजावण्याचा प्रयत्न
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसून ठिय्या आंदोलन सुरूच आहे.एकीकडे पोलिस तपास सुरू असताना, दुसरीकडे शहरातील तणावपूर्ण वातावरण आणि सुरू असलेले आंदोलन यामुळे खोपोलीत खळबळ उडाली आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.