उरण : "उरण तालुक्यातील चिर्ले ही क्रिकेटची पंढरी आहे. रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम नाईट क्रिकेट स्पर्धा या चिर्लेच्या मैदानावर झाल्या होत्या. तो इतिहास चिर्लेच्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आजपर्यंत जपला आहे. या मैदानावरील व्यासपीठावर राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. त्यामुळे या भूमीला क्रिकेटचा उत्तम वारसा आहे. चिर्ले हे हुतात्म्यांचे गाव आहे. त्यामुळे या गावाला कायमस्वरूपी मैदानासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन," असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. उरण तालुक्यातील चिर्ले येथे चॅलेंजर ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. प्रकाशझोतातील या ट्रॉफीचे बुधवारी (ता. २४) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी चॅलेंजर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक माजी उपसरपंच समाधान माळी यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष अखलाक शिलोत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य डॉ. मनीष पाटील, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर, विनोद पाटील, घनश्याम पाटील, अविनाश ठाकूर, रमेश पाटील, अश्वित थळी, तसेच असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि एमजी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी भव्य कार रॅलीने रसिकांचे लक्ष्य वेधले होते.