सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग; बॉलिवूड निर्माते संदीप सिंह थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडे–विकी जैन यांचा मदतीचा हात
  • नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला, सब इनस्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौर आणि स्थायी समिती हवी; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
  • राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार
 व्यक्ती विशेष

राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार

डिजिटल पुणे    26-12-2025 17:28:12

मुंबई : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.  त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला. प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक देऊन जगताप यांचे स्वागत करण्यात आले.

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले,

“राजकारण बंद करेन, पण आता काँग्रेसमधून जाणार नाही. गांधी, नेहरू, शिव, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांसाठी मी काँग्रेसमध्ये आलो आहे. माझी लढाई भाजपविरोधी, संघविरोधी आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आहे.”ते पुढे म्हणाले की,“मी कोणाशीही वाद घालून पक्ष सोडलेला नाही. २६ वर्षे राष्ट्रवादीत काम करताना कधीही माध्यमांमध्ये पक्षाविरोधात बोललो नाही. आताही काँग्रेसची जी भूमिका असेल, त्याच्याशी एकनिष्ठ राहीन.”

राष्ट्रवादीतील आघाडीच्या चर्चेमुळे नाराजी

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अजित पवार गटासोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने प्रशांत जगताप नाराज होते. भाजपसोबत जाणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुणे शहर आणि विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वानवडी परिसरातून सलग तीन वेळा नगरसेवक, तसेच २०१६-१७ मध्ये पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का

दुसरीकडे, प्रशांत जगताप यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पुण्यात मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. पुण्यातील पक्षाची प्रमुख ताकद असलेला नेता गमावल्याने आगामी निवडणुकांत त्याचा परिणाम दिसू शकतो.

कोण आहेत प्रशांत जगताप?

प्रशांत जगताप यांनी १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली. 

पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून, ते वानवडी प्रभागातून निवडून येत आहेत.

 २०१६-१७ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०२१ मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

२०२३ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर पदी राहिलेले आहेत.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख आहे.

शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रशांत जगताप यांची पुण्यात ओळख  आहे.

२०२४ विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून लढवली होती.

सलग तीन वेळा वानवडी परिसरातून नगरसेवक राहिले आहेत.

२००७,२०१२ आणि २०१७ या तिन्ही महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप निवडून आले.

महापालिकेत महापौर,पीएमपीएल संचालक,पक्ष वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.

प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे साहजिकच काँग्रेसची ताकद पुण्यात वाढणार आहे. 

हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांचा चांगला संपर्क आहे. त्याच परिसरातून काँग्रेसला ताकद मिळून नगरसेवक पद वाढण्याची शक्यता आहे. 

शहरात सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने एक चांगला नेता मिळेलच, सोबत काँग्रेसची ताकद ही वाढेल.

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसणार आहे. 

काँग्रेसमधील अनेक जण नाराज असल्याचेही चर्चा आता समोर आले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडल्याने मोठा फटका बसला आहे.

प्रशांत जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे एकमेव ताकतीचा नेता होता. प्रशांत जगताप यांच्यासारखा कोणीही नेता सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे नाही.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद प्रशांत जगताप गेल्याने कमी झाल्याची चर्चा आहे. त्याचा फटका आता महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती