मुंबई : मुंबईतील अंधेरी वेस्ट, सोरेंटो सोसायटीत गुरुवारी भीषण आग लागली.अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो सोसायटीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. २३ मजली इमारतीच्या १२, १३ आणि १४ व्या मजल्यावर आग आणि दाट धुरामुळे मोठी अफरातफर उडाली. या आगीत प्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप सिंह यांच्या घराचेही नुकसान झाले असून ते थोडक्यात बचावले आहेत.या आगीत चित्रपट निर्माते संदीप सिंह यांच्या घराचेही नुकसान झालं. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी संदीप सिंहला सुरक्षितपणे बाहेर काढले. मुंबईतील गगनचुंबी आणि पॉश इमारतींमधील आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच अंधेरी वेस्टच्या सोरेंटो सोसायटीमध्ये गुरूवारी भीषण आगीची घटना घडली आहे. आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं होतं. या आगीमुळे 12व्या, 13 व्या आणि 14व्या मजल्यावर गोंधळ उडाला होता. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते संदीप सिंह यांच्या घराला देखील आगीनं विळखा घातला होता. निर्माता संदीप सिंह यांचे घर सोरेंटो सोसायटीच्या 14 व्या मजल्यावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब आता सुरक्षित असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी घटनास्थळी जाऊन त्यांची मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सोरेंटो टॉवरमध्ये अचानक आग लागली. आगीमुळे इमारतीतील इलेक्ट्रिकल डक्ट व केबल्स जळून खाक झाल्याने काही वेळातच संपूर्ण परिसरात दाट धुराचे साम्राज्य पसरले. धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते, त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
या आगीचा सर्वाधिक फटका १४व्या मजल्याला बसला असून याच मजल्यावर संदीप सिंह यांचे घर व कार्यालय आहे. नुकतेच त्यांच्यावर हर्नियाचे ऑपरेशन झाले होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. अशातच त्यांच्या इमारतीला आग लागल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून संदीप सिंह यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचे पती विकी जैन तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संदीप सिंह यांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढून आपल्या घरी नेले. सध्या तिघांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून अंकिता आणि विकी यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, मुंबईतील उंच आणि पॉश इमारतींमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाकडून आगीच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणांचीही चौकशी केली जात आहे..दरम्यान, मुंबईतील गगनचुंबी आणि पॉश इमारतींमध्ये वाढत चाललेल्या आगीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.