मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) ला मुंबईत एकही जागा न दिल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले संतापले आहेत. महायुतीने आमच्याशी निव्वळ विश्वासघात केला असून हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.
रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या स्थापनेपासून रिपाई प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिली आहे. मात्र, जागावाटपाबाबत जो प्रकार घडला, तो आमच्या स्वाभिमानावर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आठवले म्हणाले, “जागावाटपाच्या चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ ठरली होती. मात्र मित्रपक्षांकडून त्या वेळेचेही पालन झाले नाही. हा केवळ वेळेचा अपव्यय नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना हा अपमान मी सहन करणार नाही.”
कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आज दुपारी 12 वाजता रिपाईची अंतिम भूमिका आणि निर्णय अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. “माझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच सोमवारी रात्री भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यानुसार, मुंबईत भाजप 137 तर शिंदे गट 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र या यादीत रिपाईसाठी एकाही जागेचा उल्लेख नसल्याने वाद चिघळला आहे.
रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेत रिपाईसाठी किमान 16 जागांची मागणी केली होती. यापूर्वी त्यांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी वांद्रे येथील संविधान निवासस्थानी भेट घेऊन रिपाईला सन्मानजनक जागा दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. रिपाई हा महायुतीतील महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
मात्र प्रत्यक्ष जागावाटप जाहीर झाल्यानंतर रिपाईला पूर्णतः डावलण्यात आल्याने आठवले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता भाजप किंवा शिंदे गट आपल्या कोट्यातून रिपाईला आयत्यावेळी जागा सोडणार का, की महायुतीतील हा तणाव अधिक वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.