नागपूर : नागपूर–वर्धा महामार्गावर जुनापाणी गावाजवळ आज (30 डिसेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव प्रवासी ट्रॅव्हल्सने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर 25 प्रवासी गंभीर ते किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तसेच काहींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात अतिवेग, चालकाला डुलकी येणे किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकची दृष्टीआड स्थिती ही संभाव्य कारणे मानली जात आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.