सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

वाकडमध्ये भाजपची डॅमेज कंट्रोल रणनीती; प्रभाग २५ मधील अंतर्गत धुसफूस शांत करण्याचा यशस्वी प्रयत्न

अजिंक्य स्वामी    30-12-2025 14:15:58

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने राजकीय समतोल साधणारी महत्त्वाची खेळी खेळल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर करताना पक्षाने अत्यंत काळजीपूर्वक राजकीय गणित मांडले आहे.

भाजपतर्फे सर्वसाधारण महिला (प्रभाग २५ क) या गटातून भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पत्नी श्रुती वाकडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सर्वसाधारण पुरुष (प्रभाग २५ ड) मधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राहुल कलाटे यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय, महायुतीच्या समन्वयातून

• प्रभाग २५ अ मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) गटातर्फे कुणाल वाव्हळकर

• प्रभाग २५ ब मधून रेश्माताई चेतन भुजबळ

यांनाही अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या चारही उमेदवारांच्या नावांची घोषणा म्हणजे प्रभाग २५ साठी आखलेली पूर्ण राजकीय रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राम वाकडकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी वाढल्यास प्रभागात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र राम वाकडकर यांच्या पत्नींना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांची नाराजी शमवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.

एकीकडे जुने स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखत, तर दुसरीकडे नव्याने प्रवेश केलेल्या नेत्याला महत्त्वाची उमेदवारी देत भाजपने समन्वयाचा सुवर्णमध्य साधल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर आरपीआय गटाला प्रभाग २५ अ मध्ये स्थान देऊन महायुतीतील घटक पक्षांनाही विश्वासात घेण्यात आले आहे.

या निर्णयामुळे प्रभाग २५ मधील अंतर्गत धुसफूस, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारीचे धोके मोठ्या प्रमाणात टळल्याचे सध्या चित्र आहे. भाजप व महायुतीच्या या नियोजनबद्ध निर्णयामुळे वाकड प्रभागात संघटनात्मक एकजूट दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

आगामी काळात हे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचारात कितपत समन्वय साधतात, आणि ही अंतर्गत शांतता निवडणूक निकालापर्यंत टिकते का, याकडे आता संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे राजकीय लक्ष लागले आहे. प्रभाग २५ मधील ही रणनीती भाजपसाठी निवडणूकपूर्व महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरते का, हे येणारा काळच ठरवणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती