नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असताना नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचे वाटप सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचवेळी इच्छुक उमेदवारांनी थेट तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू होती. याच नाराजीचा उद्रेक आज थेट रस्त्यावर दिसून आला. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या ताब्यातील एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनाचा इच्छुक उमेदवारांकडून पाठलाग करण्यात आला. पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील इच्छुक उमेदवार या पाठलागात सहभागी असल्याची माहिती आहे. सुमारे तासभर नाशिक–मुंबई महामार्गावर तिकीट वाटपाचा थरार पाहायला मिळाला.
पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचे वाटप
यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये तिकीट वाटपाला सुरुवात करण्यात आली. मात्र वाढत्या तणावाची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तिकीट वाटपाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमलेली गर्दी तात्काळ पांगवली.
तिकिटांचा काळाबाजार असल्याचा गंभीर आरोप
दरम्यान, काही इच्छुक उमेदवारांनी भाजपमध्ये तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या गदारोळामुळे नाशिक महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप नेतृत्व नाराज इच्छुकांची समजूत कशी काढते आणि पुढील काही तासांत आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर
दरम्यान, भाजपने नाशिक महानगरपालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जाहीर झाली आहे. या युतीकडून पहिल्या चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
यामध्ये स्मिता दीपक पाटोदकर, माजी नगरसेवक समीर कांबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे आणि माजी नगरसेविका हेमलता पाटील यांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांनी युतीच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.