सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

मोठी बातमी : राज्यात 14 महापालिकांमध्ये भाजप–शिंदे गटाची युती तुटली; कुठे-कुठे होणार थेट लढत?

डिजिटल पुणे    30-12-2025 16:53:35

महाराष्ट्र : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. जागावाटपावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये तीव्र रस्सीखेच झाल्याने तब्बल 14 महानगरपालिकांमध्ये युती तुटली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आता थेट आणि बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.

जागावाटपावरून संघर्ष, स्थानिक पातळीवर बंडखोरी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली दिसून आल्या. काही ठिकाणी इच्छुकांना उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण असले, तरी अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही महापालिकांमध्ये पक्षांतर करून आलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना तिकीट दिल्याचा आरोप होत असून, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

14 महापालिकांमध्ये भाजप–शिंदे गट वेगवेगळे

जागावाटपावर एकमत न झाल्याने खालील 14 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत—

पुणे

पिंपरी-चिंचवड

नाशिक

नांदेड

अमरावती

मालेगाव

अकोला

मीरा-भाईंदर

नवी मुंबई

धुळे

उल्हासनगर

सांगली

छत्रपती संभाजीनगर

जालना

या शहरांमध्ये आता तिरंगी अथवा बहुरंगी लढती होणार असून, महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई आणि ठाण्यात मात्र युती कायम

महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये भाजप–शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना युतीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुंबई–ठाण्यातील राजकीय समीकरणे वेगळीच रंगताना दिसणार आहेत.

15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.युती तुटलेल्या आणि युती टिकलेल्या दोन्ही ठिकाणी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती