पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात भाजपकडून राहुल कलाटे वि. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कडून मयूर कलाटे अशी थेट लढत होणार असून, दोन्ही उमेदवारांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. एकाच आडनावाचे असले तरी त्यांचा राजकीय प्रवास, कार्यशैली आणि नेतृत्वाचा अनुभव वेगवेगळा असल्याने ही लढत विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
मयूर कलाटे : अनुभवसंपन्न नगरसेवक, शांत व संयमी नेतृत्व
मयूर कलाटे यांच्या मागे थेट नगरसेवक पदाचा अनुभव आहे. महापालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती, प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता आणि सभागृहातील अनुभव ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.मयूर कलाटे यांचा स्वभाव शांत, संयमी आणि समतोल असल्याचे ओळखले जाते. वादाऐवजी संवादावर भर देणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असून, स्थानिक युवकांमध्ये ते विशेषतः लोकप्रिय आहेत. युवकांचे प्रश्न, रोजगार, सामाजिक उपक्रम यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
राजकीयदृष्ट्या पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक ही मयूर कलाटे यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संपर्क असल्याने प्रभागातील विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय पाठबळ मिळू शकते, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
राहुल कलाटे : विकासाभिमुख राजकारण, नेतृत्वाचा मोठा अनुभव
दुसरीकडे राहुल कलाटे यांच्या मागे दीर्घ आणि व्यापक राजकीय अनुभव आहे. त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले असून, त्याचबरोबर शिवसेनेकडून सभागृहात गटनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.याशिवाय, त्यांनी तीन विधानसभा निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असून, निवडणूक रणनिती, प्रचार यंत्रणा, मतदार व्यवस्थापन आणि राजकीय संघर्ष याबाबत त्यांची पकड मजबूत असल्याचे मानले जाते.
राहुल कलाटे यांची ओळख विकासाभिमुख नेतृत्व, ठाम मत मांडणी आणि थेट जनतेशी संपर्क ठेवणारा नेता अशी आहे. सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटांशी काम करून विकासकामे मार्गी लावण्याचा त्यांचा अनुभव वाखाणण्याजोगा असून, ‘हा अनुभव आणि कामाचा लेखाजोखा’ हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख आधार असणार आहे.
प्रभाग २५ : वेगवान शहरीकरण, पण मूलभूत प्रश्न कायम
वाकड, पुनावळे, ताथवडे व परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २५ हा पिंपरी-चिंचवडमधील वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक आहे. आयटी पार्क्स, नव्या गृहसंकुलांमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी त्या तुलनेत नागरी सुविधा अद्याप अपुऱ्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या प्रभागात अनियमित पाणीपुरवठा, वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच अतिक्रमणांची समस्या हे मुद्दे रोजच्या जीवनावर परिणाम करणारे ठरत आहेत. विशेषतः अंतर्गत रस्त्यांवरील पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर, राहुल कलाटे आणि मयूर कलाटे हे दोन्ही उमेदवार या समस्यांवर कोणत्या ठोस उपाययोजना सुचवतात, दीर्घकालीन विकास आराखडा कसा मांडतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मतदारांचा विश्वास कसा संपादन करतात, यावर त्यांच्या निवडणूक भवितव्याचा निर्णय अवलंबून असणार आहे.
अनुभव, संयम, नेतृत्वशैली आणि विकासाची स्पष्ट दिशा—या सर्व मुद्द्यांवर मतदारांचे लक्ष केंद्रीत असून, प्रभाग २५ मधील ही लढत केवळ व्यक्तींची नव्हे तर योजना आणि विश्वासार्हतेची कसोटी ठरणार आहे.म्हणूनच प्रभाग २५ मधील ही ‘कलाटे विरुद्ध कलाटे’ लढत संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत असून, निकालाकडे राजकीय वर्तुळ उत्सुकतेने पाहत आहे.