मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातील युवासेना सहसचिव समृद्ध शिर्के यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मालाडमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे–पवार युतीला आव्हान निर्माण झाले आहे.
मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 हा ठाकरे गटाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच प्रभागातून शिवसेना ठाकरे गटाला मोठा लीड मिळाला होता. मात्र, यंदा जागावाटपात हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
शिवसेना–मनसे युतीनंतर प्रभाग 43 मधून निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाकडून समृद्ध शिर्के यांना तयारीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हा प्रभाग राष्ट्रवादीच्या तुतारीला गेल्यामुळे शिर्के नाराज झाले आणि अखेर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटासह ठाकरे–पवार युतीला मोठा धक्का मानला जात आहे.
या प्रभागात आता ठाकरे गटाशी संबंधित अपक्ष उमेदवार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. “माझ्या कामावर आणि जनतेच्या विश्वासावर मी निवडून येईन,” असा विश्वास समृद्ध शिर्के यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत एकूणच मोठ्या प्रमाणावर बंडखोरी पाहायला मिळत असून सर्वच प्रमुख पक्षांना त्याचा फटका बसत आहे. भाजप–शिंदे गटाची महायुती, ठाकरे–पवार युती तसेच काँग्रेस–वंचित आघाडीमुळे मुंबईत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.