सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 विश्लेषण

जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

डिजिटल पुणे    02-01-2026 16:14:48

बीड :  बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासीयांना केले.जनतेच्या पैशातून होत असलेली विविध विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, यावर बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जिल्ह्यातील 1363 विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचे भूमिपूजन, टेनिस कोर्टाचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते  झाले. यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘दिवाळी नवीन घरात’ उपक्रमाचा समारोप, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, ध्वज निधी संकलनात बीड जिल्हा राज्यात प्रथम आल्याने सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळाही या एकाच ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार बजरंग सोनवणे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर,  विजयसिंह पंडित, बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान,  जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत उपस्थित होते.श्री.पवार म्हणाले, नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. येत्या नववर्षात आपणास बीडच्या विकासात अधिक भर घालायची आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच 1363 विकासकामांनी सुरूवात झाली आहे, ही आनंदाची बाब आहे. बीड जिल्ह्यात एकाच वेळेस एवढ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होत आहेत, त्यामध्ये आपणा सर्वांची साथ असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद, जिल्हा सैनिक कार्यालय व इतर कार्यालयांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम होत आहे. त्याला जनतेचीही साथ आहे, त्यामुळे येथील जनतेला जनतेला धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले. यासह त्यांनी जिल्ह्यात देण्यात आलेल्या भरीव निधीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी सह  शासन मान्यता दिल्याचे आवर्जून सांगितले.

बीड-परळी रेल्वे, भूसंपादनाची आवश्यकता, रेल्वेचे इलेक्ट्रीफिकेशन, ऊसतोड कामगारांसाठी उर्वरित पाच तालुक्यात वस्तीगृहे, अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाचा बृहत आराखडा, सीट्रीपल आयटी, आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी नियोजन, रेशीम उत्पादन भरभराटीसाठी सिल्क पार्क, विज्ञान उद्यान, तारांगण पार्क, पुरातन वास्तूंचे जतन, बीडसाठी दरदिवसाला पाणी मिळावे यासाठीचे नियोजन आदी बाबींवरही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

सहकार मंत्री पाटील म्हणाले, केंद्र, राज्यपातळीवरील सहकार विभागाचे काम उत्तम आहे. राज्याने सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे, या सहकाराच्या माध्यमातून राज्याची ओळख जगभर आहे. येणाऱ्या काळामध्ये तरुणांच्या हाताला काम, महिलांचे सक्षमीकरण सहकार क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात करण्यात येणार आहे. सहकारी चळवळीला अधिक गतिमान करण्यावर शासनाचा भर आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सहकार भवनाची आवश्यकता होती, म्हणून 14 कोटी 98 लाख एवढ्या रकमेचे सहकार संकुल याठिकाणी उभे राहत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगत सहकार विभागाशी संबंधित १० कार्यालये एकाच ठिकाणी या संकुलामध्ये  राहतील. त्यामुळे नागरिकांची सोय होणार असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्ज्वलनाने व, राष्ट्रगीत, राज्यगीताने झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. आभार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी मानले.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत तब्बल १३६३ कामांचे भूमीपूजन करण्यात आले यासह इतर विकासकामांचेही उद्घाटन, पुरस्कार वितरण श्री पवार यांच्या हस्ते पार पडले.

विक्रमी ५० हजार घरकुलांचे स्वप्न साकार

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (ग्रामीण) ‘सर्वांसाठी घरकुल’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने जुलै २०२५ पासून “दिवाळी नवीन घरकुलात” हा विशेष उपक्रम राबवला होता. या उपक्रमांतर्गत दिवाळीपर्यंत ५०,००० घरकुले पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा जिल्ह्याने गाठला आहे. या यशामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या ६ पंचायत समित्या, २ ग्रामपंचायती आणि गृहनिर्माण अभियंत्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

नियोजनबद्ध विकास: १३६३ कामांचा एकाच वेळी प्रारंभ

जिल्हा वार्षिक योजनेच्या इतिहासात प्रथमच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कामांची आखणी करण्यात आली आहे. डिसेंबर अखेर ९०% कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, त्यांचे सर्वेक्षण आणि तांत्रिक अंदाजपत्रके पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे आज एकाच वेळी जिल्हा परिषदेकडील १००५ आणि राज्य यंत्रणेकडील ३५८ अशा एकूण १३६३ कामांचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यामुळे सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला बळ

आदर्श शिक्षक पुरस्कार : गेल्या तीन शैक्षणिक वर्षांत (२०२२-२३ ते २०२४-२५) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ६४ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यापुढे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात यावेत, अशा सूचना श्री. पवार यांनी प्रशासनाला केल्या.

टॅब वितरण

महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी प्रवर्गातील २९३ विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातील ५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब वाटप करण्यात आले.

टेनिस कोर्टाचे लोकार्पण

जिल्हा क्रीडा संकुल येथे ८० लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज सिन्थेटीक लॉन टेनिस कोर्टाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची घोषणा

कार्यक्रमात वडवणी येथील स्व. महीपतराव गणपतराव कोठूळे शासकीय आयटीआयच्या इमारतीसाठी ८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देऊन त्याचे भूमीपूजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक अधिकारी यांचा सन्मान

ध्वजनिधी संकलनात बीड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा विशेष सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती