नाशिक: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथील हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) येथे भेट देऊन तेथील विमान निर्मिती आणि अनुषंगिक बाबींची अतिशय आस्थेवाईकपणे माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील तंत्रज्ञ, अधिकारी यांच्याशीही संवाद साधत आपण खऱ्या अर्थाने देशसेवेचे काम करत आहात, अशा शब्दात कौतुकोद्गार काढले.राज्यपाल देवव्रत यांनी एचएएल येथे येऊन देशाच्या संरक्षण साहित्य आणि उत्पादन निर्मितीच्या अनुषंगाने सुरू असलेले कामांची माहिती जाणून घेतली. देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण अशा सुखोई ३० एमकेआय, तेजस ध्रुव, प्रचंड यांच्या निर्मितीचा प्रवास तेथील अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्याकडून जाणून घेतला. विविध कक्षाना यावेळी त्यांनी भेट दिली.
सुरुवातीला आगमन झाल्यानंतर एचएएलचे सीईओ साकेत चतुर्वेदी यांनी स्वागत केले, यावेळी कार्यकारी संचालक डायरेक्टर (एअर क्राफ्ट manufacturing डिव्हिसन) कार्यकारी संचालक (फायनान्स) शिशिरकुमार पात्रा, जनरल मॅनेजर (एअर क्राफ्ट overall division ) वरिंदर कुमार, जनरल मॅनेजर (चीफ ऑफ प्रोजेक्ट) सुब्रत मंडल, जनरल मॅनेजर (ए ओ डी) एस. बी चौधरी, जनरल मॅनेजर (AURDC) एस. डी. बेहरा, सीओपी(AMD) एस के नसीरुल्लाह, जनरल मॅनेजर (मनुष्यबळ) जतिंदर कौर आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नाशिक) कश्मिरा संख्ये, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, तहसीलदार अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यपाल देवव्रत यांनी एचएएल येथील विश्रामगृहावर विविध मान्यवरांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या सहकार्यासाठी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या व्हॉईस बोट या तंत्रज्ञानाची माहितीही राज्यपालांनी जाणून घेतली.