पुणे: शांतिनिकेतन गुरुकुल( कोर्टी ता.पंढरपूर ) व एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सावित्री उत्सव२०२६"अंतर्गत "संवाद सावित्रीच्या लेकींशी" कार्यक्रमाचे आयोजन दि. ३ जानेवारी रोजी शांतिनिकेतन गुरुकुल, कोर्टी ता.पंढरपूर येथे करण्यात आले होते.
या वेळी दत्तात्रय कोंडलकर (संस्थापक, शांतिनिकेतन गुरुकुल), उपेंद्र टण्णू (सहसचिव, एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन) व राहुल भोसले (व्यवस्थापक, एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात शांतिनिकेतन गुरुकुलच्या ३०० विद्यार्थिनी, शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पुष्पा क्षीरसागर यांनी सावित्रीची ओवी सामुहिकपणे म्हणून घेतली.प्रणिता वारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आपल्याला फक्त मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या, पहिल्या स्त्री शिक्षिका किंवा स्त्री शिक्षणाचा आणि महिला सक्षमीकरणाचा पाया रचणाऱ्या एवढ्या पूरत्याच माहित आहेत. परंतु ही महत्वाची असली तरी त्यांची फारच छोटी आणि मर्यादित अशी ओळख आहे. सावित्रबाईंचं एकूणच व्यक्तिमत्व हे या सर्वांच्या पलीकडे अजून खूप काही आहे आणि ते त्यांच्या साहित्यातून विशेषतः त्यांच्या कवितांमधून प्रकर्षाने जाणवतं. स्त्री शिक्षणाबरोबरच त्याकाळची सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, दारिद्र्य, स्त्री पुरुष असमानता अशा अनेक विषयांवर त्या स्पष्टपणे व्यक्त होत होत्या. वेळप्रसंगी व्यवस्थेला परखड प्रश्न विचारत होत्या. त्याचप्रमाणे अगदी सध्या सोप्या भाषेत मानवी जीवनाची नीतिमूल्येही समजावून सांगत होत्या.
एवढंच नाही तर त्यांच्यातली निरीक्षण करणारी संवेदनशील कवयित्री निसर्गावर देखील कविता रचत होती. शिक्षणा बरोबरच निसर्ग आणि मानवी जीवन यांची योग्य सांगड घालूनच आपण मानवी आयुष्याचा विकास करू शकतो आणि अधिक समृद्ध असं आयुष्य जगू शकतो हे सुद्धा त्या सांगत होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे झाकोळले गेलेले, प्रकाशात न आलेले, असे हे अनेक पैलू आपण समजून घेऊन कृतीत उतरवूया. हीच सावित्रीबाईंना खरी कृतिशील आदरांजली ठरेल अशी मांडणी केली.
पुष्पा क्षीरसागर यांनी वयात येताना होणारे बदल शारीरिक जे असतात,त्यामध्ये आपल्या भोवतालच्या गोष्टींचा परिणाम का व तो चुकीचा का आहे हे सांगितले.मासिक पाळी बद्दलचे tabu (निषिध्दता) कोणते, ते का दूर करणे गरजेचे आहे.या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून निकोप वातावरण निर्माण होण्यासाठी काय काय करायचे.पाळीमागचे विज्ञान समजून घेऊन त्याबाबत घ्या अंधश्रद्धा दूर करुया अशी मांडणी केली.