मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने शीबॉक्स (SHEBOX) पोर्टल तयार केले असून, सर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपले कार्यालय नोंदवणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व आस्थापनांनी तात्काळ या पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत समितीची तसेच कार्यालयाची अद्ययावत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) एस. टी. कुऱ्हाडे यांनी केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 नुसार, 10 किंवा त्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या अधिनियमाच्या कलम 19 अन्वये कार्यालय प्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. जर कोणत्याही कार्यालयाने ही समिती स्थापन केली नसल्यास किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास, कलम 26 नुसार रु. 50,000/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, पहिला मजला, दुसरा टप्पा, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ दूरध्वनी : ०२२-२५२३२३०८ , E-mail : [email protected] यावर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आहे.