सिंधुदुर्गनगरी :- सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, आजचा हा दिवस ऐतिहासिक असून या इमारतीचे महत्त्व सावंतवाडी उपविभागातील प्रत्येक नागरिकाला आहे. या इमारतीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे आभार मानले. ही इमारत ठरलेल्या कालावधीत पूर्ण होणे अत्यावश्यक असून, दोन वर्षांच्या ऐवजी एका वर्षातच काम पूर्ण झाल्यास संबंधित यंत्रणेचा विशेष सत्कार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख झाले पाहिजे. असे स्पष्ट करत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, नागरिकांना कमीत कमी चकरा माराव्या लागतील, अशा पद्धतीने कामकाज व्हावे. नागरिकांशी आपुलकीने वागणे, त्यांच्या कामांना प्राधान्य देणे व कोणतीही तक्रार येऊ न देणे, हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकासकामे आणि विविध प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले. या विकास प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे तीन तालुके विकासाची मोठी क्षमता असलेले असून, या उपविभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले की, ही इमारत अत्यंत सुसज्ज स्वरूपाची असणार या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सेवा पारदर्शकपणे मिळणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले .कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली. त्या म्हणाल्या की, आजचा हा क्षण ऐतिहासिक आहे. सन १९१० साली बांधण्यात आलेली जुनी इमारत आता कालबाह्य झाल्याने नागरिकांच्या गरजेनुसार नवीन आणि आधुनिक इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही इमारत भविष्यात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आभार उपविभागीय अधिकारी सचिन घारे यांनी केले. ते म्हणाले, या इमारतीमधून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला जाईल. नागरिकांना कमी वेळेत अधिक सेवा देण्यात येतील असेही ते म्हणाले.या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष श्रीमती श्रद्धा राजे भोसले, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी सचिन घारे, उपसंचालक जमाबंदी आयुक्त कार्यालय हेमंत निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी , युवराज लक्ष्मणराजे भोसले आदी उपस्थित होते.