बीड : बीड शहरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना एका मजुरावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हर्षद शिंदे (रा. बीड) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ही घटना शहरातील अंकुश नगर परिसरात घडली. काम सुरू असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला. गोळी लागल्याने हर्षद शिंदे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे बीड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.