सातारा : सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देणारी आहे. यापुढेही माध्यम प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांनी साताऱ्याच्या उज्वल विकासासाठी हातात हात घालून एकत्र काम करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री देसाई यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने पत्रकार, सर्व माध्यमांतील प्रतिनिधींसाठी आयोजित चहापान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह संपादक, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडीयाचे प्रतिनिधी, समाज माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्याला निर्भिड पत्रकारीतेचा वारसा असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, या आधीच्या पिढीतील अनेक दिग्गज पत्रकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारिता केली. लोकहितकारी उपक्रमांना भरु भरुन पाठींबा देत असतानाच जिथे चुका व त्रूटी आढळलेल्या त्यावर कठोरपणे प्रहार करुन डोळ्यात अंजन घालण्याचे कामही त्यांनी केले. समाजातील अनिष्ठ प्रथा, समस्या यावर प्रकाश टाकून लोकांना जागरुक करण्याचे काम पत्रकारितेने केल्याचे सांगून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच झालेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संयोजक, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रशासकीय यंत्रणा यांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.खासदार नितीन पाटील यांनी यावेळी पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जे चांगले त्याला प्रसिद्धी देण्याचे आणि जिथे त्रुटी आढळल्या त्या निर्दशनास आणून देण्याचे कार्य साताऱ्यातील वृत्तपत्रे व मीडिया अव्याहतपणे करत आला आहे. साताऱ्यातील वृत्तपत्रे आणि माध्यमांनी सकारात्मक पत्रकारितेचे व लोकहितासाठी अखंडपणे लढण्याचे व्रत कायमपणे जोपासले आहे. सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा जपत असतानाच जनतेला माहिती देणे आणि कोणतीही माहिती सत्य व वस्तुनिष्ठ स्वरुपात मांडणे असा येथील पत्रकारितेचा अनुभव आपण घेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी 32 वर्षांनंतर साताऱ्यात झालेले 99 वे अखिल भारतीय संमेलन यशस्वी करण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे वरिष्ठ पत्रकार असून हे साहित्य संमेलन साताऱ्यात आणण्यात आणि चार दिवसांचे साहित्य संमेलन अनेक नवीन मापदंडांसह निर्माण करत यशस्वी करण्यात त्यांच्या बजावलेल्या भूमिकेचा अभिमान असल्याबाबत गौरवपूर्ण उद्गार काढले.यावेळी कुलकर्णी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी यांनी प्रशासनाने या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याबद्दल प्रशासन व सर्वच घटकांचे आभार मानले.