छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच एमआयएमचे माजी खासदार व पक्षाचे प्रमुख नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
प्रचार रॅलीदरम्यान बायजीपुरा–जिन्सी परिसरात धावत्या कारचा पाठलाग करत जलील यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला काही जणांनी काळे झेंडे दाखवले, त्यानंतर परिस्थिती चिघळली. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या घटनेत जलील यांच्या गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. तसेच एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून इतर कार्यकर्त्यांबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
नाराज गटाकडून हल्ल्याचा आरोप
हा हल्ला एमआयएममधील नाराज गटाकडून झाल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमने तब्बल 22 नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाला होता. त्याचेच पडसाद या घटनेत उमटल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस उमेदवारावर आरोप
इम्तियाज जलील यांनी या घटनेमागे कलीम कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. कलीम कुरेशी हे प्रभाग 9 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, तर प्रभाग 14 मधून काँग्रेसचे उमेदवार असल्याचे सांगितले जाते.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवला असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.