उरण : सिडकोने विमानतळबाधित गावांचे पुनर्वसन करताना अंतर्गत रस्ते अतिशय छोटे दिलेत.यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न येत्या काळात निर्माण होईल. त्यामुळे भविष्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात.प्रकल्पग्रस्त गावांचे भूमिपुत्र स्थलांतरापूर्वी विनासायास गावाशेजारील माळरानावर, गुरचरण जमिनीवर बिन्धास्त खेळत होते. आता सिडकोने हजारो एकर गुरचरण जमीन फुकटात लाटली आहे.मात्र विमानतळबाधित विस्थापित गावांसाठी मैदाने दिलीच नव्हती. त्यामुळे सिडकोच्या वरिष्ठांसोबत मैदानांचा विषय गंभीर असून तो तातडीने सुटला पाहिजे म्हणून चर्चा केली. त्यानुसार विमानतळबाधित उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी या विस्थापित गावांसाठी साडेसहा एकरचे मैदान मिळविण्यात मला यश आले आहे. तसे आरक्षण टाकून घेतले आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे शेलघर येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते उलवे नोड प्रीमियर लिगचे उदघाटन मंगळवारी सायंकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मतलबी सरकारने दिबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमान उड्डाण होऊनही अद्याप दिले नाही. ही भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक आहे. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असूनही दिबांच्या नावाला आम्ही पाठिंबा दिला होता. आताच्या सत्ताधीशांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. 'मी मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे दाखव,' अशीच वागणूक सत्ताधीशांची दिसतेय; परंतु प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एक ना एक दिवस पेटून उठेल. तेव्हा आताच्या सत्ताधीशांना पळता भूई थोडी होईल, असेही महेंद्रशेठ घरत म्हणाले. माझ्या शेलघर गावचा विकास करताना आम्ही गावकऱ्यांनी राजकीय पक्षांच्या चपला बाजूला ठेवल्या. मी माझ्या शेलघर गावाच्या विकासासाठी कंबर कसली आणि १५ वर्षांत गावाचा चेहरामोहरा बदलला. म्हणूनच शेलघर आज आदर्श गाव म्हणून नावाजले आहे. शेलघरसाठी सर्वप्रथम सुनियोजित मैदान विकसित करून घेतले. भलेभले आडवे आले, पण त्यांनाही मी परिस्थितीनुरूप सरळ केले.म्हणूनच आज पंचक्रोशित शेलघरचे मैदान प्रसिद्ध आहे, असेही महेंद्रशेठ यावेळी म्हणाले. त्यांनी आपल्या गावच्या मैदानावर प्रीमियर लिग होत असल्याने आणि गावचा अभिमान म्हणून सर्वाधिक आर्थिक साह्य केले आहे.यावेळी सचिन घरत, रतनशेठ भगत, न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, सरपंच विजेंद्र पाटील, अमर म्हात्रे, सुधीर ठाकूर, उलवे नोड प्रीमियर लिगचे सदस्य उपस्थित होते.