पुणे : “दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करून अतिशय उत्तम काम केले!” अशा शब्दांत म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांकडून मिळणाऱ्या अशा सकारात्मक प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी चंद्रकांतदादांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हाळुंग्यातील व्हीटीपी ब्लेअर येथील सोसायटीच्या रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी देशात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देत, भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सोसायटीचे रहिवासी शिरीष भावसार यांनी चंद्रकांतदादांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींना उच्च शिक्षण घेणे अधिक सुलभ झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, भाजप नेत्या जागृती विचारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.