मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम) २०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम, येथे करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय परिषद भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (आयआयआयडीईएम) मार्फत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाणार आहे.
भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असून, जगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असून, “समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले की, ही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चा, सर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.
या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्था, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असून, भारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्र, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठक, कार्यगट बैठका, ईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.
तीन दिवसांच्या या परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक द्विपक्षीय बैठका विविध देशांच्या निवडणूक संस्थांच्या प्रमुखांसोबत पार पडणार आहेत.या परिषदेत चार आयआयटी, सहा आयआयएम, १२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयू) आणि आयआयएमसी यांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असून, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली ३६ विषयक गट चर्चेत सहभागी होणार आहेत, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.