'पुणे : स्मार्ट सिटी म्हणून भरपूर निधी खर्च करूनही प्रत्यक्षामध्ये लोकांच्या जगण्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. वाहतूक कोंडी,आरोग्य सुविधा नसणे, कचऱ्याचे ढीग हे या सर्व समस्या या जशाच्या तशा आहेत. आधीच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या जाहिरातबाजी शिवाय काही काम केले नाही. त्यामुळे आता मतदारांनीच बदल करण्याचे ठरवले आहे ' असे आम आदमी पार्टी चे उमेदवार अमित जावीर यांनी सांगितले.
औंध बोपोडी या प्रभाग ८ मधून आम आदमी पार्टीतर्फे अमित जावीर, विकास चव्हाण, मुस्कान आत्तार व ॲन अनिश हे उमेदवार उभे आहेत. या भागातील पूर्वीच्या भाजप नगरसेवकांना तिकीट नाकारले गेल्यामुळे आता ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे आहेत. पक्ष बदलायच्या सततच्या प्रवृत्तीमुळे काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ असून प्रचारापासून दोन हात लांब राहिलेले आहेत.
औंध बोपोडी भागात अत्यंत तरुण कार्यकर्त्यांना आम आदमी पार्टीने संधी दिली असून त्यांचे स्थानिक काम हे या आधीच्या नगरसेवकांपेक्षाही जास्त आहे. यावेळेस मतदार झाडू चा वापर करून प्रस्थापितांना बाजूला करेल असे यावेळेस आप चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
तरुणांना महिलांना आणि सामाजिक घटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करीत सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीने केला आहे. भाऊ पाटील रोड, औंध रोड, चिखलवाडी या भागात आप ने मोठी दुचाकींची रॅली आणि त्यानंतर घरोघरी भेट देत प्रचार करत या निवडणुकीमध्ये रंग आणला आहे.