सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
  • मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 राजकारण

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा; शिवसैनिक संतापले

डिजिटल पुणे    09-01-2026 12:55:39

मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यानंतर आता मुंबईतही भाजप आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याने वातावरण तापले.

वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. सकाळच्या प्रचारावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आले असता घोषणाबाजी सुरू झाली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोषणा मित्रपक्ष भाजपकडूनच दिल्या गेल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिवसेना-भाजप जागावाटपानुसार हा वॉर्ड शिंदे सेनेला मिळाला होता. त्यानुसार पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो वैध ठरल्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घ्यावा लागला.

या प्रकारावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपमुळे नव्हे, तर आमच्यामुळे भाजप सत्तेत आहे. अशा घोषणा देण्यापूर्वी फडणवीस यांना विचारले पाहिजे,” असे शिरसाट म्हणाले. तर भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मतदानाला काही तास शिल्लक असताना घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती