पुणे : विश्रांतवाडी येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, खेड शिवापूर परिसरातील डोंगरात बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा थंड डोक्याने काटा काढला. खून करण्यापूर्वी आरोपींनी अमनसिंगला त्याची “शेवटची इच्छा” विचारली. त्यावर त्याने बिअर आणि सिगारेटची मागणी केली. आरोपींनी ती आणून दिल्यानंतर त्याच्याकडून स्वतःचा खड्डा खोदून घेतला.
यानंतर अमनसिंगला खड्ड्यात पुरून पुन्हा बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्जिकल ब्लेड व कोयत्याने गळ्यावर वार करत डोके दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह पुन्हा त्याच खड्ड्यात पुरून आरोपी पसार झाले. खेड शिवापूर येथील मंदिराच्या डोंगर परिसरात तब्बल तीन ते चार तास हा थरार सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. तसेच सोशल मीडियावर बनावट प्रोफाइलद्वारे अमनसिंगला घटनास्थळी बोलावणाऱ्या तरुणीसह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार २९ डिसेंबर रोजी घडला होता.पोलिस तपासानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाला होता. त्या वादात प्रथमेश जखमी झाला होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमनसिंगला सापळ्यात ओढून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याचे हे गंभीर उदाहरण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.