लातूर : ऊस वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून झालेल्या भीषण अपघातात ऊसतोड मजूर तथा सोशल मीडियावरील ‘रीलस्टार’ गणेश डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याच्या ग्रामविकास व महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत डोंगरे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदत पाठवली असून, फोनद्वारे कुटुंबीयांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला. लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ऊस वाहतुकीदरम्यान भीषण अपघात
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी असलेले गणेश डोंगरे हे ऊसतोडणीसाठी धाराशिव (लातूर) जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेले होते. ऊस वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरची ट्रॉली त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातामुळे कुटुंबाचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेला असून, पत्नी अश्विनी, तीन लहान मुली आणि वृद्ध आई-वडील अक्षरशः निराधार झाले आहेत.
हलाखीची परिस्थिती, कष्टातून मुलींची स्वप्नं
गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ एक एकर शेती होती. अपुऱ्या उत्पन्नामुळे त्यांनी पत्नीसमवेत गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणीचे काम स्वीकारले होते. महाराष्ट्राच्या विविध भागांत जाऊन कष्ट करत आपल्या तीन मुलींच्या शिक्षणासाठी ते झगडत होते. मात्र, एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं.
फेसबुक लाईव्हदरम्यान मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
या घटनेला अधिक धक्कादायक वळण मिळालं ते पत्नी अश्विनी फेसबुक लाईव्ह करत असतानाच अपघात घडल्यामुळे. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश डोंगरे यांच्या अंगावर पडल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. गणेश डोंगरे हे सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून ओळखले जात असल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“मला शिकायचंय” – लेकीच्या शब्दांवर पंकजा मुंडेंचं आश्वासन
फोनवरील संवादादरम्यान गणेश डोंगरे यांची मोठी मुलगी यशश्री हिने,“मला शिकायचं आहे,” अशी इच्छा व्यक्त केली.यावर पंकजा मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता,“मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जे शिक्षण घ्यायचं आहे ते घे. मोठी अधिकारी हो,”असे आश्वासन देत कुटुंबाला आधार दिला.या संवेदनशील भूमिकेमुळे सामाजिक स्तरातून पंकजा मुंडेंच्या तत्काळ मदतीचं स्वागत केलं जात आहे.