पुणे : ‘तेर ऑलिम्पियाड २०२५–२६’ या पर्यावरण विषयक राष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पत्रकार भवन सभागृह( नवी पेठ) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना टॅबलेट, मोबाईल, हार्ड ड्राइव्ह, स्मार्ट वॉच, पेन ड्राइव्ह अशी विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. हा उपक्रम यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षी वाढत्या प्रतिसादामुळे त्याची व्याप्ती अधिक व्यापक होत आहे.
व्यासपीठावर टाटा मोटर्सच्या मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अदिती गुप्ता,टाटा मोटर्सचे उप सरव्यवस्थापक रोहित सरोज, महेश गावसकर,तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे उपस्थित होत्या.ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.स्नेहा कराडे यांनी आभार मानले. प्रा. इरफान शेख, राज मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमधील संस्थात्मक सहभागासाठीचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र कॉस्मॉपॉलीटन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला देण्यात आला.संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी सहकाऱ्यांसमवेत तो स्वीकारला .तेर ग्रीन इनिशिएटिव्ह पुरस्कार अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज,पै पब्लिक स्कूल,इंग्लिश मीडियम स्कूल,अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल,आबेदा इनामदार जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स-कॉमर्स-सायन्स यांना देण्यात आला.शाळांसाठीचे पहिले पारितोषिक स्टार पब्लिक स्कूल (मेघालय) यांना देण्यात आले. सीडलिंग गटातील पहिले पारितोषिक मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम स्कूलला देण्यात आले.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणीय प्रश्नांची जाणीव लहान वयातच निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे असून, अशा उपक्रमांमुळे भावी पिढी अधिक जबाबदार बनेल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ.विनिता आपटे म्हणाल्या,"तेर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या उद्देशाने ही राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन ऑलिम्पियाड स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते . स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे. या वेळी १ ते ४ गटासाठी सिडलिंग हा नवीन विभाग सुरू करण्यात आला . अगदी बाल वयात पर्यावरण संस्कार होतील याची आम्हाला खात्री आहे . एका माणसाला १४ झाडांमुळे जितका ऑक्सिजन निर्माण होतो तितका आवश्यक असतो . आजवर तेर पॉलिसी सेंटर ने लावलेल्या झाडांमुळे 18 हजार टन कार्बन शोषून घेतला आहे , अशी माहिती संस्थेच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात दिली. देशभरातून विविध गटांतील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
अदिती गुप्ता म्हणाल्या,'विद्यार्थ्यांमध्ये पर्यावारांविषयक जागृती करणे हे आयुष्यभर उपयोगी पडणारे काम आहे.ही स्पर्धा त्यासाठी प्रेरक उपक्रम आहे. सर्वानी वृक्ष संवर्धनातून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे'.
कार्यक्रमात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा , संस्था आणि शिक्षकांचाही विशेष गौरव करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, तो यशस्वीरीत्या साध्य होत असल्याचे या समारंभातून स्पष्ट झाले.
प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून जगवावीत*: माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
"पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरात आणि परिसरात झाडे लावली पाहिजेत आणि केवळ लावून न थांबता ती जगवलीही पाहिजेत. वृक्ष लागवड साठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यावर आपली नावे लिहिली पाहिजे," असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले.जावडेकर यांनी आपल्या भाषणात भविष्यातील पर्यावरणाच्या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले , 'निसर्गाचे ऑक्सिजन चक्र जपण्याची गरज आहे.तापमान वाढीवर वृक्ष लागवड हा उपाय आहे.निसर्ग शिकला पाहिजे आणि त्यानुसार जीवन कौशल्ये, जीवनशैली बदलली पाहिजे. पाणी, वीज वाचवून झाडांची संख्या वाढवली पाहिजे. प्लास्टिक वापर कमी करून पुनर्वापर वाढवला पाहिजे.जर आपल्याला पुढच्या पिढीला सुरक्षित भविष्य द्यायचे असेल, तर आताच पर्यावरणाबाबत जागृत होणे आवश्यक आहे. निसर्गाकडून आपण जे घेतो, ते झाडांच्या रूपात परत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असेही ते म्हणाले.
कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचे (CSR) कौतुक
कार्यक्रमादरम्यान टाटा मोटर्स, तेर पॉलिसी सेंटर च्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचेही जावडेकर यांनी कौतुक केले. पर्यावरण रक्षणासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता कॉर्पोरेट संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. 'तेर ऑलिम्पियाड' सारख्या उपक्रमांमुळे शालेय वयापासूनच मुलांमध्ये पर्यावरणाविषयी ओढ आणि ज्ञान निर्माण होण्यास मदत होत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "एक व्यक्ती - चौदा झाडे" हे समीकरण उचलून धरल्यामुळे उपस्थितांना वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.