धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात एक अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. आई आणि काका यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना देत असल्याच्या रागातून चुलत्यानेच आपल्या 13 वर्षीय पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव ओमकार देवीदास कांबळे (रा. कोळसूर, ता. उमरगा) असे असून तो आपल्या भावजयसोबत सालगडी म्हणून काम करत होता. आरोपी ओमकार आणि त्याची भावजय ज्योती कांबळे यांच्यात अनैतिक संबंध होते. या संबंधांची माहिती मुलगा कृष्णा सदानंद कांबळे (वय 13) वडिलांना देत असल्याने तो या संबंधात अडसर ठरत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ओमकार कांबळे याने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळ विद्युत पंपाचा पाइप बसवण्याच्या बहाण्याने नेले. त्याठिकाणी त्याने कृष्णावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह तलावाजवळील गवताखाली फेकून देत आरोपी फरार झाला.
5 जानेवारी रोजी तामलवाडी साठवण तलाव परिसरात मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान मृत मुलाची ओळख पटताच संशय बळावला. तांत्रिक विश्लेषण आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी ओमकार कांबळे याला उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून ताब्यात घेतले.पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तामलवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तामलवाडीसह संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.