पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा–२०२६’ दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी, एरंडवणे येथे उत्साहात पार पडली. सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे यंदाचे हे बारावे वर्ष होते.उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी,भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप,कुलगुरू डॉ.विवेक सावजी,कुलसचिव जे.जयकुमार,आयएमईडीचे संचालक डॉ.श्रवण कडवेकर, उपसंचालक डॉ. आर. व्ही. महाडिक हे मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे,औदार्याचे स्मरण केले.ते म्हणाले,'डॉ.पतंगराव कदम यांचे शैक्षणिक योगदान अतुलनीय आहे.महाराष्ट्रातील पिढयांना भारती विद्यापीठामुळे दर्जेदार शिक्षणाची दारे खुली झाली.वैयक्तीक पातळीवर ते अतिशय मोकळे आणि दिलदार व्यक्ती होते.त्यांनी अनेकांशी स्नेह जपला आणि वाढविला.त्यांच्या जीवनसंघर्षातून नव्या पिढीला बरेच काही शिकता येईल. '
डॉ.अस्मिता जगताप म्हणाल्या,'नव्या पिढीची भाषा बदलत असताना वक्तृत्व स्पर्धातून भाषा बळकट करण्याचा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे'.कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना वक्तृत्व शैली जोपासण्याचा मंत्र दिला.डॉ.श्रवण कडवेकर यांनी स्पर्धेची आणि इन्स्टिट्यूटच्या प्रगतीची माहिती दिली.आय एम ई डीचे उपसंचालक डॉ.आर.व्ही.महाडिक यांनी आभार मानले.
या स्पर्धेत देशभरातील ९० महाविद्यालयांमधून सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी दोन स्पर्धक अंध होते. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी विविध विषयांवर प्रभावी मांडणी करत आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. प्राथमिक फेरीत २० वेगवेगळ्या पॅनेलद्वारे स्पर्धकांच्या वक्तृत्व कौशल्यांचे परीक्षण केले गेले. यामधून अंतिम फेरीसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. हेमा मिरजी, डॉ. विजय फाळके, डॉ. प्रमोद पवार, डॅा.श्रेयस डिंगणकर, डॉ. सुचेता कांची, प्रतिमा गुंड, यांच्यासह आयएमईडी तील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला, आत्मविश्वासाला आणि सामाजिक जाणिवेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून, तो यंदाही यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले..