मुंबई : सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत व डॉ. सरिता हजारे उपस्थित होते. तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नियुक्त सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, (से.नि. महासंचालक, आरोग्य सेवा) आणि डॉ. मोहन जाधव, (से.नि. संचालक आरोग्य सेवा) यांनी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला. आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी प्रभावी काम करावे, यासाठी त्यांनी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करावे. आपले प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था इतक्या प्रभावी सर्वसमावेशक असाव्यात की परराज्यांतील कर्मचाऱ्यांनीही या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करावी.
तालुका आरोग्य अधिकारीपदास प्राधान्याने बळकटी देण्यावर भर देण्यात येत असून तालुका आरोग्य अधिकारी हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्वाचा असुन, प्रशिक्षण कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) आणि समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांचा आवर्जून समावेश करावा. पद संवर्गनिहाय प्रशिक्षणाचा सविस्तर आराखडा तयार करुन एक महिन्याच्या आत मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.