सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मी आयुष्यातील सर्व आनंद उपभोगलाय, गमावण्यासारखं काहीच नाही, माझ्या नादाला लागलात तर... गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
  • मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
  • राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर घणाघाती टीका; “1500 रुपये 15 दिवसांत संपतात”
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
 जिल्हा

नांदेड येथील ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम ऐतिहासिक करावा

डिजिटल पुणे    10-01-2026 15:05:52

नांदेड :  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यामाने ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले आहे.

जथ्येदार साहेब भाई कुलवंत सिंग जी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  म्हणाले की, महाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापना करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास, पाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, असेही नाईक म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती