पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षांची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्य मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठीची हॉल तिकीटे उद्यापासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
हॉल तिकीटावर प्राचार्यांची स्वाक्षरी बंधनकारक
बारावीच्या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेशपत्र दिले जाणार आहे. या प्रवेशपत्राच्या प्रतीवर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो असल्यास त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी केल्यानंतरच ते वैध मानले जाईल. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे सक्तीचे आहे.
परीक्षा व प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्याआधी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन व प्रात्यक्षिक परीक्षांचाही यात समावेश आहे.
ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळेत हॉल तिकीट प्राप्त करून त्यावरील सर्व तपशील तपासावेत, तसेच परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.