नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात एटीएम चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी कटरने शटर तोडत थेट जीपला दोरखंड बांधून संपूर्ण एटीएम मशीन उखडून नेले. अवघ्या 12 मिनिटांत हा डाव साधत चोरटे पसार झाले, त्यामुळे एटीएम सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर ताहाराबाद रोडवरील यशवंत नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये घडली. रात्री 2.50 वाजता तीन अज्ञात चोरटे जीपमधून घटनास्थळी पोहोचले. कटरच्या मदतीने शटर तोडल्यानंतर एटीएमला दोरखंड बांधून ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोनदा दोर तुटला, मात्र तिसऱ्या प्रयत्नात संपूर्ण एटीएम बाहेर काढण्यात यश आले. पहाटे 3.02 वाजता एटीएम जीपमध्ये टाकून चोरटे साक्रीच्या दिशेने फरार झाले.
एटीएममध्ये छेडछाड होताच दिल्लीतील मुख्यालयात अलार्म वाजला. तेथून नाशिक नियंत्रण कक्ष व सटाणा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस 14 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सीसीटीव्ही तपासात चोरटे 30 वर्षांच्या आसपासचे, चेहऱ्यावर कापड बांधलेले दिसून आले.
या एटीएममध्ये एकूण 40 लाख रुपये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 25 लाख 99 हजार 400 रुपये शिल्लक होते. पुढे तपासात चोरीला गेलेले एटीएम धुळे जिल्ह्यातील साक्री शहराजवळ आढळून आले. शेतात मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना स्थानिक नागरिकांना संशय आल्याने प्रकाशझोत टाकताच चोरटे एटीएम तिथेच टाकून पळून गेले.
तपासात एटीएममधील पाचपैकी दोन ट्रे उघडता न आल्याने 9 लाख 55 हजार 900 रुपये सुरक्षित राहिल्याचे निष्पन्न झाले. मात्र उर्वरित 16 लाख 43 हजार 500 रुपये चोरटे घेऊन पसार झाले. सटाणा व साक्री पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू असून चोरट्यांचा शोध वेगाने सुरू आहे.एटीएम सुरक्षा, अलार्म प्रतिसाद वेळ आणि एकट्या ठिकाणी असलेल्या मशीनच्या संरक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.