पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘मधुबिंब’ निर्मित ‘क्षण रंगती’ हा एकपात्री प्रयोग रविवार,दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. स्वातंत्र्यवीर सावरकर,पु.ल.देशपांडे आणि कुसुमाग्रज या त्रयींच्या निवडक साहित्यावर आधारित हा प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेते यतिन ठाकूर यांनी प्रभावीपणे सादर केला.साहित्य, विचार आणि अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम साधत त्यांनी विविध भावछटा,आशयघनता आणि अभिनयातील बारकावे रसिकांपर्यंत पोहोचवले.
या एकपात्री प्रयोगातून देशप्रेम,माणुसकी,विनोद,संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा यांचे विविध पैलू उलगडले गेले.सभागृहात उपस्थित असलेल्या रसिकांनी प्रत्येक प्रसंगाला मनापासून दाद दिली आणि कार्यक्रमाच्या शेवटी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकाराचे भरभरून कौतुक केले.भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत सादर झालेला हा २७४ वा कार्यक्रम असून प्रवेश विनामूल्य होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ठाकूर यांचा सत्कार केला.