नाशिक : अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दोन्ही उपनिरीक्षक फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. शकुंतला हाइट्स, कामटवाडे रोड, सिडको) आणि अतुल भुजंगराव क्षीरसागर (रा. सिंहगड, शासकीय विश्रामगृह) अशी फरार उपनिरीक्षकांची नावे आहेत.
या प्रकरणात गडकरी चौक येथील शासकीय विश्रामगृहातील उपहारगृह चालक रमेश गंभीरराव आहिरे आणि त्यांचा मुलगा कल्पेश रमेश आहिरे यांनी मध्यस्थी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौघांनी संगनमताने लाचेची रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात हे उपनिरीक्षक कार्यरत होते, त्याच ठाण्यात त्यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित असून तो व्यवसायाने कंत्राटदार आहे. अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याची मागणी उपहारगृह चालक कल्पेश आहिरे याच्यामार्फत करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
लाच देण्यास नकार देत केतन पवारने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान कल्पेश आहिरे याने पंचासमक्ष दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. चौकशीत ही रक्कम उपनिरीक्षक गोडे व क्षीरसागर यांच्यासाठीच घेतल्याची कबुली त्याने दिली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकाने केली. सध्या दोन्ही उपनिरीक्षक फरार असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पूनम केदार करत आहेत.दरम्यान, अतुल क्षीरसागर हा या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आहिरे पिता-पुत्रांच्या माध्यमातून उपनिरीक्षकांपर्यंत पोहोचत लाचखोरीचा डाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे.