लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच पैसे वाटपाच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या एका उमेदवाराच्या नातेवाईकाला मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या खिशातून मतदारांची नावे आणि उमेदवाराचे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने सर्व आरोप फेटाळून लावत, “मी वैयक्तिक कामासाठी बाहेर पडलो होतो. माझ्याकडे असलेले पैसे माझे स्वतःचे आहेत. निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही,” असा दावा केला आहे.या प्रकरणी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पैसे वाटपाच्या आरोपांमुळे लातूरमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.