पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग करणाऱ्या प्रकारांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या एफएसटी भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरातून तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत.
ही कारवाई 12 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पार पडावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षांतर्गत एसएसटी, एफएसटी आणि व्हीएसटी अशी विविध पथके शहरभर कार्यरत आहेत.
12 जानेवारी रोजी रात्री 10.23 वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणीतील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफएसटी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान एका वाहनामध्ये (क्रमांक MH 14 KA 6330) एकूण 19 वॉशिंग मशीन आढळून आल्या, ज्या तात्काळ जप्त करण्यात आल्या.