वाशिम : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे आढळून येत आहे. या नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहर पोलिसांनी कारवाई करत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला आहे. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर अडीच लाख रुपयांचा दंड, तर नायलॉन मांजासह पतंग उडवणाऱ्यांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी आपली व इतरांची सुरक्षितता लक्षात घेता नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक कागदी मांजाचाच वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.