थायलंड : थायलंडमध्ये एक अत्यंत भीषण रेल्वे अपघात घडला असून, धावत्या हायस्पीड पॅसेंजर ट्रेनवर 65 फूट उंचीवरील पुलावरून एक अवजड क्रेन कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृत आणि जखमी प्रवाशांमध्ये बहुसंख्य शाळकरी विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही दुर्घटना नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात घडली. सदर ट्रेन राजधानी बँकॉकहून उबोन रत्चाथानीकडे जात होती. ट्रेन सुमारे 120 किमी प्रतितास वेगाने धावत असताना पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन अचानक कोसळली आणि ट्रेनच्या तीन डब्यांवर आदळली.
ड्रायव्हरला ब्रेक लावण्याची संधीच मिळाली नाही
‘नेशन थायलंड’ या वृत्तसंस्थेनुसार, क्रेन अचानक कोसळल्याने ट्रेनच्या चालकाला ब्रेक लावण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. क्रेनचा मोठा ढिगारा थेट डब्यांवर पडल्यामुळे अनेक डबे रुळावरून घसरले, तर काही डब्यांना आगही लागली. विशेषतः ज्या दोन डब्यांवर क्रेन थेट कोसळली, त्यामध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्याने तेथेच सर्वाधिक जीवितहानी झाली.
बचावकार्य युद्धपातळीवर
अपघातानंतर काही मिनिटांतच बचाव पथके, अग्निशमन दल आणि वैद्यकीय ताफा घटनास्थळी दाखल झाला. डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कटिंग व स्प्रेडिंग उपकरणांचा वापर करण्यात आला. आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती बचाव पथकांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी बचावकार्य अद्याप सुरू आहे.
रेल्वे डबे दोन तुकड्यांत विभागले
घटनास्थळी असलेल्या एका स्थानिक रहिवाशाने एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, प्रथम एक प्रचंड आवाज झाला आणि त्यानंतर सलग दोन स्फोट ऐकू आले. “मी धावत घटनास्थळी पोहोचलो तेव्हा क्रेन थेट प्रवासी ट्रेनवर कोसळलेली दिसली. क्रेनमधील लोखंडी भागाने ट्रेनच्या मध्यभागी जबर धडक दिल्याने डबे दोन तुकड्यांत विभागले गेले,” असे त्याने सांगितले.
चौकशीचे आदेश
या दुर्घटनेनंतर प्रशासन आणि रेल्वे विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. क्रेन कोसळण्यामागील कारण, बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, तसेच निष्काळजीपणा झाला का, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे संपूर्ण थायलंडमध्ये शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.