मुंबई : अवघ्या 35 रुपयांच्या वादातून मुंबईत एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. सिगरेटचे पैसे थकवल्याच्या रागातून एका तरुणाने मित्राच्या काकांवर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
जोगेश्वरी येथील एका पानटपरीवर सिगरेटच्या 35 रुपयांवरून 22 वर्षीय नागेंद्र यादव आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. हा वाद वाढत असताना भांडण मिटवण्यासाठी मित्राचे काका राजेंद्र यादव हे तेथे गेले. मात्र, रागाच्या भरात नागेंद्र यादवने राजेंद्र यादव यांच्यावर थेट पेट्रोल ओतून आग लावली.या आगीत राजेंद्र यादव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीत घटना कैद
ही संपूर्ण थरारक घटना पानटपरीजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नागेंद्र यादव याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.अत्यंत क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या अमानुष घटनेने मुंबईसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.