पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून,भाजपचे आमदार शंकर जगताप आणि भाजपच्या माजी आमदार व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यातील आरोप–प्रत्यारोपांमुळे हा वाद अधिकच चिघळताना दिसत आहे.
आमदार शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवारावर थेट टीका करत अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “तो उमेदवार नमकहरामी आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू केली. याच पोस्टमध्ये त्यांनी अतिशय खोचक शब्दांत प्रश्न उपस्थित केला की, “लक्ष्मणभाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास का?” या शब्दांतून त्यांनी थेट भाजपचे प्रभाग क्र. ३१ मधील उमेदवार माऊली जगताप यांच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांना प्रभाग क्रमांक ३१ मधून महापालिका निवडणुकीत उतरवले आहे. विशेष म्हणजे माऊली जगताप हे मूळच्या प्रभाग क्रमांक २९ मधील रहिवासी असल्याने, “आयात उमेदवार नको” अशी भूमिका स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत शंकर जगताप यांनी ही बाब गुप्त ठेवली होती. मात्र निवडणूक आयोगाने यादी जाहीर करताच प्रभाग ३१ मधील भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माऊली जगताप यांनी गुलाल लावलेला फोटो शेअर करत, “पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले” अशी पोस्ट केली. याच पोस्टवरून अश्विनी जगताप यांनी संताप व्यक्त करत ‘नमकहरामी’चा आरोप केला आहे. पुढे त्यांनी लिहिले की, “हे स्वप्न नाही तर विश्वासघात आहे. ज्यांनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरोधात वर्षानुवर्षे मनात विष पेरलेस.” या शब्दांतून त्यांनी अप्रत्यक्षपणे शंकर जगताप यांनाही लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
मतदानाच्या काही तास आधी हा वाद उफाळल्याने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप आमनेसामने आल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, या घरातील संघर्षाचा फटका थेट भाजपला बसणार का, याकडे आता संपूर्ण पिंपरी–चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.