पुणे : पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सिंचन प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून अजित पवारांनी थेट तत्कालीन भाजप–शिवसेना युती सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सूचक इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “अजित पवार ज्या पद्धतीने भाजपवर आरोप करत आहेत, त्याबाबत परवा कॅबिनेट बैठक आहे. या विषयावर देवेंद्रजींशी चर्चा करू आणि पुढे काय भूमिका घ्यायची ते ठरवू.” तसेच, “अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? पुन्हा आम्हाला सगळ्यांना मांडीला मांडी लावून बसावं लागणार का?” असा सवाल करत त्यांनी राजकीय सूचक विधान केलं.
दरम्यान, अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेचा संदर्भ देत मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, “1999 साली काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र चौकशी केली असता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष खर्च फक्त 200 कोटी रुपये असल्याचे मान्य केले.”
अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, ही किंमत वाढ तत्कालीन भाजप–शिवसेना युती सरकारच्या काळात करण्यात आली होती, जेव्हा सिंचन खाते भाजपकडे होते. “पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यात अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कोटी जोडले आणि 200 कोटींचा प्रकल्प 310 कोटींवर नेण्यात आला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची फाईल आजही माझ्याकडे आहे. ती बाहेर काढली असती, तर मोठा हाहाकार उडाला असता, असेही अजित पवार म्हणाले.
या आरोपांवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “1999 साली मी अर्थमंत्री होतो. त्या काळात असा कोणताही निर्णय झाल्याचे मला आठवत नाही. जर इतकी गंभीर माहिती होती, तर अजित पवारांनी ती तब्बल 25 वर्षे लपवून का ठेवली?” असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील काळात या मुद्द्यावरून राजकीय घडामोडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.