सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 राजकारण

पुण्यात गावाकडून मतदार आणल्याचा आरोप, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

डिजिटल पुणे    15-01-2026 16:56:13

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसली जाणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याच्या तक्रारी अशा अनेक गैरप्रकारांच्या घटना समोर येत आहेत. यावरून विविध शहरांमध्ये राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

पुण्यात गावाकडून मतदार आणल्याचा आरोप

पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख आणि उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी महादेववाडी-उंड्री परिसरात खासगी वाहनातून ग्रामीण भागातून लोकांना मतदानासाठी आणल्याचा आरोप केला आहे. उंड्री चौक परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा करत संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

जालन्यात बोगस मतदार ताब्यात

जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरात एका व्यक्तीने दुसऱ्याच्या नावावर मतदान केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर मधुकर देठे नावाच्या संशयित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून खातरजमा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.

सोलापुरात कर्नाटकातून मतदार आणल्याचा दावा

सोलापुरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाला. समाजवादी पक्षाने एमआयएमकडून कर्नाटकातून गाड्या भरून सुमारे दोन हजार बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे. बोगस मतदार पकडल्यानंतर त्यांनी माफी मागून मतदान केंद्र सोडल्याचा दावाही समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज खरादी यांनी केला.

बोरिवलीत फेक वोटर आयडी पकडले

मुंबईतील बोरिवली प्रभाग क्रमांक 10 मध्ये ‘भगवा गार्ड’कडून फेक वोटर आयडी पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपकडून फेक आयडी आणि वोटिंग स्लिप वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला. स्थानिक आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

भांडुपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

भांडुपच्या आदर्श नगर प्रभाग क्रमांक 114 मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद झाला. बाचाबाचीचे रूपांतर गोंधळात झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मतदान केंद्रावरील वातावरण शांत केले.दरम्यान, विविध शहरांतील या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती