पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील काही प्रभागांमध्ये बोगस मतदान, दुबार मतदान आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाचे प्रकार उघडकीस आले असून, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
प्रभाग क्रमांक 24 मध्ये तर चक्क येरवडा तुरुंगात असलेल्या आरोपीच्या नावावर मतदान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपी तुरुंगात असताना त्याच्या नावावर मतदान कसे झाले, असा सवाल उपस्थित करत उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावावर ती मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच मतदान झाल्याचा प्रकार समोर आला. शेख हसीना असे या महिलेचे नाव असून गेल्या 35 वर्षांपासून त्या याच मतदान केंद्रावर मतदान करत आहेत. संबंधित महिलेला ‘पोस्टल मतदान झाले आहे’ असे उत्तर देण्यात आल्याने संशय अधिकच बळावला आहे.
विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 24 ड मध्ये भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बीडकर उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे गणेश नवघरे आणि शिवसेनेचे प्रवीण धंगेकर यांचे आव्हान आहे. अशा चुरशीच्या लढतीत बोगस मतदानाचा आरोप झाल्याने या प्रभागाकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावरच बोट ठेवले आहे.
“कुठे EVM बिघाड, कुठे बोटावरील शाई पुसली जात आहे, तर कुठे मतदानाची टक्केवारी वेळेत जाहीर केली जात नाही. अनेक केंद्रांवर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार नाहीत. ही सगळी परिस्थिती गोंधळ निर्माण करणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी जाहीर न करता सायंकाळी एकत्र आकडे वाढवले जात आहेत. हा बोगस मतदानासाठीचा डाव तर नाही ना?” असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आज शाई पुसली जातेय, उद्या लोकशाही पुसली जाईल, असा इशाराही दिला.
पुण्यात चौरंगी लढत, निकालाकडे सर्वांचे लक्ष
पुणे शहरातील 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार असून, येथे चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना, काँग्रेस, उबाठा आणि मनसे स्वतंत्रपणे रिंगणात असल्याने पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.