मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजप युतीने 89 जागा जिंकत मुंबईत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत ही निवडणूक लढवत होते. मात्र अपेक्षित यश मिळाले नसल्याची कबुली देतही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले,“सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक सोपी नव्हती. अचाट धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती. अशा परिस्थितीतही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली.”मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याची खंत व्यक्त करत ते पुढे म्हणाले,“मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही, पण म्हणून आम्ही खचणारे नाही. आमचे निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाच्या विरोधात काही घडताना दिसले, तर त्यांना जेरीस आणतील.”
‘निवडणुका येतील जातील, पण श्वास मराठीच’
राज ठाकरे पुढे म्हणाले,“आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि मराठी अस्मितेची आहे. ही दीर्घकालीन लढाई आहे. एमएमआर परिसरात असो किंवा संपूर्ण राज्यात, मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभे राहणे आवश्यक आहे. निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे, हे विसरायचे नाही.”
मुंबईत मनसेचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 38 – सुरेखा परब
प्रभाग क्रमांक 74 – विद्या आर्या
प्रभाग क्रमांक 115 – ज्योती राजभोज
प्रभाग क्रमांक 128 – सई शिर्के
प्रभाग क्रमांक 192 – यशवंत किल्लेदार
प्रभाग क्रमांक 205 – सुप्रिया दळवी