नाशिक : नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्केड्रॉनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत सूर्यकिरण एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोचा नाशिकवासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्याला देशसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. या इतिहासाला उजाळा मिळावा आणि तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल.
एअर शोच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी सराव सत्र होईल. गंगापूर धरण परिसर एअर शोसाठी पूरक आहे. तेथील दृश्यमानता, सुरक्षितता या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. या शोकरीता तिकिट असणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे. येथे वाहनतळ, स्टॉल सह विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच पोलिस बॅण्ड पथक असेल. या शोमुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या एअर शो चा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.